[0:01]अनघाने आज सर्व लाल मॅचिंग केले होते. आजची तिची लाल मॅक्सी खूप छान होती. अनघाला कोणताही कलर उठून दिसायचा. लांबसडक केसांची तिने सैलसर वेणी घातली होती. लाडक्या लेकीच्या या भरगच्च कच बंधाचे सुमतीबाईंना भारी कौतुक वाटते. आज तिला पहिला पिरीएड तळ मजल्यावर होता. पिरियड संपला. आता तिला इकोनॉमिक्सच्या पिरियड साठी तिसऱ्या मजल्यावर जायचे होते. जिना चढताना आज ती फार सावकाश चढत होती. ती ही भिंतीच्या बाजूने तिने मनोमन ठरवून टाकले होते, आता यापुढे कठड्याला धरून चालण्याची सवय मोडायची. तिसरा जिना ती चढत होती. नकळत ती थबकली. त्याच बाजूने सावकाश तो तरुण जिना उतरत होता. दोघेही एकमेकासमोर आले. काहीही न बोलण्याचा अनघाचा निश्चय ढळला. आजूबाजूला इतर विद्यार्थी आहेत हे पाहून तो अगदी हळू आवाजात म्हणाला, "माझ्या मनातील विचार ओळखल्याप्रमाणे आज तुमची ही चाल 'सावकाश' आणि कठड्याला सोडून दिसते आहे." पुढे ती उपरोध पूर्ण स्वरात म्हणाली, "मला वाटले त्यापेक्षा बरेच हुशार दिसता आहात तुम्ही!"
[1:08]अभिजितही त्याच उपरोध पूर्ण स्वरात म्हणाला, "मी किती हुशार आहे, मला माहिती आहे. तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून काही एक ऐकण्याची इच्छा नाहीये माझी." त्याने आपल्याला सरळ फालतू म्हणावे? अनघाचा रागाचा पारा चढला. "मी नाही, तुम्हीच फालतू आहात! मवाली आहात. नालायक... अंह अति नालायक आहात!" पुढे तिचे काही एक ऐकायला तो तिथे थांबलाच नाही. सरळ तो जिना उतरू लागला. अनघाचा अगदी तिळपापड झाला. तो न थांबल्यामुळे तिच्या तोंडातील शब्द तोंडातच राहिले. तिसरा पिरियड सुटताच ती लगबगीने क्लेराच्या वर्गात गेली.
[1:46]क्लेराने तिच्यासाठी जागा ठेवली होतीच. जागा मागेच होती. शेवटून तिसऱ्या लाईनमध्ये, क्लेराच्या शेजारी बसताच, अनघाने त्या तरुणाचा आज घडलेला आगाऊपणा सांगितला. क्लेरा म्हणाली, "आता आपण सगळ्याजणी मिळून खरेच त्याला चांगला धडा शिकवू. चांगला शिदा करू त्याला." सेकंड बेल झाली. बाहेर रेंगाळणारे विद्यार्थी भराभर वर्गात येऊ लागले, आणि त्यामध्ये अनघाने त्याला पाहिले, 'तोच तो' अनघा चटकन क्लेराला म्हणाली, "अय्या! अगं तो या वर्गात आहे होय? मला वाटले होते निदान तो टी. वाय.ला असेल. नालायक कुठला." "कोणता म्हणतेस तू...?" क्लेराने विचारले. त्याचवेळी अभिजीतने प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला. "तोच गं स्टेजवर चढतो आहे तो." आता मात्र क्लेराला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. डोळे विस्फारून ती एवढेच म्हणाली, "देशमुख सर." "अरे बाप रे! ओड गॉड!" अनघा एवढेच बोलू शकली. अभिजितने नेहमीप्रमाणे वर्गावरून एक नजर फिरवली. गालातल्या गालात स्मित केले, आणि अनघाला कालच्या शीलाच्या शब्दांची आठवण झाली, "देशमुख सरांचे स्माईल मस्त आहे. अगदी शशी कपूरसारखे." अनघाच्या अंगाचे भीतीने पाणी पाणी झाले होते. बाई गं S! हा एवढा सर्वांचा आवडता, आणि त्याला आपण वाटेल तसं बोललो. फडतूस मुलगा समजून. आता त्यांनी जर आपल्याकडे पाहिले तर काही धडगत नाही. चांगला हात धुऊन घेतील. तिने मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. ते कविता शिकविण्यात गढले होते. अनघा प्रथमच त्यांचे निरीक्षण करीत होती. पिंक कलरचा नाजूक डिझाईन असलेला हाफ मॅनीला आणि पांढरी पॅन्ट. किती शोभून दिसतो आहे हा ड्रेस त्यांना. ही कविता मागच्याच वर्षी आपण शिकलो आहोत. पण आता वाटते, ही कविता आज प्रथमच शिकतो आहोत आपण. किती छान शिकवितात. ती एकटक त्यांच्याकडे पाहू लागली. अभिजीतची नजर तिच्याकडे वळली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. क्षणात तो म्हणाला, "यू... गेट अप" त्याचा मृदू आवाज नाहीसा झाला. किती कठोर होता हा आवाज. सारा वर्ग त्यांनी निर्देश केलेल्या दिशेने पाहू लागला. अनघा समजून चुकली. मनात ती घाबरली. चेहरा शांत ठेवून सर्वांबरोबर तीही मागे मान करून पाहू लागली. जणू 'ती मी नव्हते'. 'तोच अभिजीतचे कडक शब्द तिच्या कानात घुसले. "यू... रेड मॅक्सी." तिचे नाव माहिती नसल्यामुळे त्याने तिच्या कपड्यांचे वर्णन केले. आता अनघाला उभे राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. क्लेरा सर्व जाणून होती, त्यामुळे ती सुद्धा अनघाप्रमाणे अस्वस्थ झाली होती. बसल्या जागी तिची चुळबूळ चालली होती. "मला वाटते, तुम्ही या वर्गातल्या नाही. मग का बसलात माझ्या पिरियडला येऊन?" त्याचे बोलणे ऐकून अनघाने मनातल्या मनात देवाचे आभार मानले, त्याने इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरूवात केली असती तर आपली विकेटच उडाली असती. तिला शांत उभी पाहून अभिजीतने पुन्हा तोच प्रश्न केला. अनघाने निश्चय केला. माघार घ्यायची नाही. तिने सरळ त्याच्या नजरेला नजर दिली, आणि ठामपणे उत्तर दिले, "मी ह्या वर्गातलीच आहे." तिचे उत्तर ऐकून अभिजीत अवाक् झाला. क्लेराही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. ह्या अनघाला वेड तर लागले नाही ना?
[5:09]अभिजीत विचार करू लागला, ह्या तीन दिवसांत ती कशी एकदाही आपल्याला दिसली नाही. वास्तविक त्याने तिची धडक झाल्यापासून आपल्या वर्गातील कानाकोपरा धुंडाळा होता. ती आपल्या कुठल्या वर्गात आहे का वाहण्यासाठी. तीन दिवसांत दिसली नाही आणि आज ह्या वर्गात. कसे शक्य आहे हे? "मी आज प्रथमच तुम्हाला पाहतोय." "त्यात माझा काय दोष?" अनघा तातडीने उत्तरली. "अस्स!" टेबलावरी कॅटलॉग हातात घेत त्याने विचारले. "नाव काय तुमचे?" तो प्रश्न ऐकून अनघापेक्षा क्लेरा गडबडली. अनघाने शांत स्वरात नाव सांगितले, "क्लेरा फर्नांडिस." अभिजीतने रोल नंबर विचारला. अनघाने शिस्तीत क्लेराची वही जवळ ओढली. त्यावरील तिचा रोल नंबर पाहून ती चटकन म्हणाली, "थ्री नॉट नाइन टू." क्लेरा थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती. काय ह्या अनूचे डोके भारी आहे. अभिजीतने त्या नंबरवर पाहिले. बरोबर होते. रोजची हजेरीही नावापुढे होती. तो चक्रावला. रोज येत होती, तर दिसली कशी नाही. शेवटचा उपाय म्हणून त्याने तिला आयडेन्टीटी कार्ड मागितले. "सॉरी, आज आय कार्ड आणायला विसरले." तिचे आय कार्ड तर तिच्या पर्समध्ये होते. पण ते दाखविल्याने सर्व बिंग फुटले असते ना? अभिजीतचे लक्ष तिच्या शेजारच्या मुलीकडे गेले, आणि त्याला हे कोडे सुटल्यासारखे झाले. होय, हीच क्लेरा असावी. ही उभी आहे ती मुळीच ख्रिश्चन वाटत नाही. अभिजीतने क्लेराला उभे केले. आता मात्र अनू घाबरली. क्लेरा आता काय सांगते कोण जाणे? तीने अगदी काकुळतीने क्लेराकडे पाहिले. क्षणभर विचार करून क्लेराने नाव सांगितले, "माझे नाव तृप्ती कुलकर्णी, रोल नंबर थ्री नॉट सिक्स फोर." अनघाने सुटकेचा निःश्वास सोडला. मोठ्या कौतुकाने तिला तिने क्लेराकडे पाहिले. अभिजीतने कॅटलॉग पाहिला. हा नंबर व नाव दोन्हीही कॅटलॉगवर होते. रोजची हजेरीही होती. "तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीसारखे आय कार्ड आणायला विसरला असणार?" "सॉरी सर," क्लेराने मान खाली घातली. अभिजीतने दोघांना बसायला सांगितले. तो पुढे शिकवू लागला, पण पूर्वीप्रमाणे तास रंगला नाही. बेल झाली. अभिजीत जाऊ लागला. त्याची नजर अनघाकडे वळली. ते समजून अनघा मुद्दाम थोडं हसली. अभिजीत वर्गाबाहेर पडला. उद्या काय ते नक्की समजणार होते त्याला. अनघाने क्लेराचा हात दाबला, "ओ! थॅंक्यू क्लेरा, तुझ्यामुळेच मी वाचले. अगं तुला उभे केले तेव्हा मी अतिशय घाबरले होते. मला वाटले आता संपला माझा अवतार, पण नाही. तू मला छान साथ दिलीस!" त्याच वेळी तृप्ती कुलकर्णी क्लेराची फास्ट फ्रेंड तिथे आली, "ए, तुम्ही दोघींनी कमालच केलीत हं. अगं क्लेराने माझे नाव सरांना सांगितले तेव्हा मी फार घाबरले बाई. सर तुम्हाला बसा म्हणाले ना तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला." दोघी मैत्रिणी खुशीत खाली आल्या. त्या येण्यापूर्वी त्यांचा संबंध ग्रुप पोर्च मध्ये उभा होता. "अनघा, क्लेराचा पिरियड अटेंड केलास ना? पाहिलस देशमुख सर? आहे की नाही त्यांचे स्माईल शशी कपूर सारखे?" शीलानी उत्सुकतेने प्रश्न विचारले. त्यावर अनघा आणि क्लेरा खळखळून हसल्या. "ए, चला तिकडे लायब्ररीमध्ये. माझे पुस्तक चेंज करते आणि मग निवांत बोलू. आता लायब्ररीत विशेष गर्दी नसते." लायब्ररीत एका टेबला भोवती साऱ्याजणी बसल्या. अनघा पुस्तक बदलून त्यांच्यामध्ये सामील झाली. प्रथम तिने सकाळी घडलेली त्या मुलाची आणि आपली वादावादी सांगितली. त्यावर मंजूषा म्हणाली, "हे आता फारच झाले हं. त्याने आपल्या अनघाला फालतू म्हणावे? उद्या दाखवू या त्याला आपला सामुदायिक प्रताप." त्यानंतर प्रत्येक जण एक एक कल्पना लढवू लागली. क्लेरा आणि अनघा शांतपणे ऐकत होत्या. सर्वानुमते उद्या त्या मुलाला चांगला धडा शिकवायचा असे ठरले. "हे सर्व खरं गं, पण आपण त्याला ओळखायचे कसे? अनू, तू त्याला पाहतच आम्हाला फक्त इशारा कर आणि तू सरळ निघून जा. मग बघ, त्याला जिन्यावर गडगड लोळी करायला शिकवतो आम्ही, "शीला म्हणाली. आता प्रथमच क्लेराने तोंड उघडले. "अगं अनघाने इशारा करण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही सगळ्याजणी त्या मुलाला ओळखता." "अय्या! म्हणजे ओळखीचाच आहे होय तो? मग एवढ्या दिवसात बोलली नाहीस हे अनघा तू? कोण आहे ग तो?" रोहिणीने विचारले, अनघाऐवजी क्लेराने तत्परतेने उत्तर दिले, "अगं तो मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नवीन आलेले देशमुख सर आहेत." क्लेराने रहस्य स्फोट केला. आता मात्र सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांचा विश्वासच बसेना. हे सर्व न पटून मंजूषा म्हणाली, "ए काहीतरीच सांगू नकोस क्लेरा तू. तुला काय वाटलं, आम्ही बावळट आहोत की काय?" "अगं, माझं खोटं वाटत असेल तर विचार अनघाला" हलकेच हसत अनघा म्हणाली, "ए मंजू, क्लेरा सांगते आहे ते शंभर टक्के सत्य आहे. ए क्लेरा, आता वर्गातील आपली धम्माल गंमत सांग ना." शीला आश्चर्याने म्हणाली, "अगं पण आज तुला त्यांनी ओळखलं असणारच." "म्हणजे, यात काय शंका? अगं दाबात त्यांना मला म्हटले रेड मॅक्सी गेट अप." आणि वर्गात घडलेली सर्व हकीगत ॲक्शन सहित अनघाने सांगितली. "अगं क्लेराने साथ दिली म्हणून मी वाचले, नाहीतरी चांगली फजिती झाली असती." हे सर्व ऐकून साऱ्याजणी थक्क झाल्या, "कमाल केलीत दोघींनी. मला तरी हे असले काही सुचलेच नसते. अनघाने क्लेराचे नाव चोरले. क्लेराने तृप्ती कुलकर्णीचे. व्वा!" मैत्रिणींनी केलेल्या कौतुकाने अनघा सुखावली. मूळ मध्ये येऊन ती बोलू लागली, "केली की नाही, त्याची चांगली फजिती, अँड मला फालतू म्हणतोय तेव्हाच ठरवले होते, त्याला तसे सोडायचे नाही. स्वतः:ला फार शहाणा समजत असेल. पण आज त्याला कळले असेल 'हम भी कुछ कम नहीं'." असं बावळट बनवलं त्याला. अगं वर्गात तर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. त्याने स्वतः:लाच दोष दिला असणार उगीच ह्या पोरीच्या वाटेला गेलो म्हणून, स्वतः:च मूर्ख ठरला." सर्वजणी हसत होत्या. अनघाच्या समोरच्या खुर्चीवर मंजूषा बसली होती. हसता हसता तिचे लक्ष अनघाच्या बरोबर मागे असणाऱ्या खुर्चीकडे गेले, आणि ती केवढ्यांदा दचकली. तिथे देशमुख सर बसले होते. ती अनघाला ते सांगणार तेवढ्यात अनघा पुढे बोलू लागली, "क्लेरा! उद्या मी त्या वर्गात दिसणार नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येईल नाही, काय या पोरींनी आपल्याला अगदी मूर्ख ठरविले. बसेल कोकलत माझ्या नावाने." तोच रोहिणी म्हणाली, "अनघा, तुझ्या नावाने नव्हे. क्लेरा फर्नांडिसच्या नावाने," त्यावर हास्याचा स्फोट झाला सगळ्याजणी हसत होत्या. मंजूषाच्या लक्षात आले. ह्या हसण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यांना खुणवत राहून उपयोग नाही, तोपर्यंत कोणीतरी काहीतरी बरळणार. ती चटकन म्हणाली, "अनघा! मागे पहा." अनघा तसेच सगळ्याजणी एकदम मागे वळून पाहू लागल्या. "बाप रे! देशमुख सर" कोरसमध्ये आवाज आला. अभिजीत शांतपणे टेबलावर हाताची दोन्ही कोपरे टेकवून, हातांची बोटे एकमेकांत गुंफवून बसला होता. मुलींच्या लक्षात आले. देशमुख सरांनी आपला शब्द न शब्द ऐकला असणार. त्यांची पाठ ह्या टेबलाकडे असली तरी अनघाच्या आणि त्यांच्या खुर्चीत केवळ दोन फुटांचे अंतर होते. साऱ्याजणी एकदम चूप झाल्या. काय करावे कोणाला काही सुचेना. प्रथम क्लेराची ट्यूब पेटली. वहा पुस्तके घेऊन ती उभी राहिली. त्वरित लायब्ररीच्या बाहेर जाण्यासाठी. तिचे अनुकरण इतरांनी इतरांनी केले. साऱ्याजणी पटापट चालू लागल्या. न हसता, न बोलता. अनघाला मात्र उठवेनाच. तिचे पाय जणू लोखंडाचे झाले होते. तिच्या मनात विचार येऊन गेला. त्यांना मवाली मुलगा समजून बोललो ते ठीक. पण ते आपल्या कॉलेज मधील एक लेक्चरर आहेत हे समजल्यानंतर आपण असं बोलायला नको होतं. हं, हा सुज्ञ विचार आता सुचून काय उपयोग? होणार तर होऊन गेले होते. अनघाला काही सुचेना. साऱ्या मैत्रिणी निघून गेल्या होत्या. त्यांच्या समोर एकटी जाण्याची हिम्मत तिच्यात राहिली नव्हती. त्यापेक्षा इथेच बसून राहणे उचित. ते निघून गेल्यानंतर आपण जाऊ या. अनघाने एक पुस्तक डोळ्यासमोर धरले. ती काही एक वाचत नव्हती. डोळ्यासमोर पुस्तक धरून ती विचार करू लागली. अभिजीत केव्हाचा इथे बसला होता. वास्तविक तो कोपऱ्यातील मोकळ्या टेबलाकडे वळला होता. तेवढ्यात त्याचे लक्ष अचानक अनघाकडे गेले. हं, हीच ती. तो तिच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्या मुलींच्या बोलण्यातून आपल्याला हिचे नाव समजेल या हेतूने. त्या मुली बोलण्यात एवढ्या रमल्या होत्या की त्यांचे लक्षही त्याच्याकडे गेले नव्हते. तो खूप झाला, त्या मुलींची बोलणी तो ऐकू लागला. कोणतरी मुलाला सामुदायिक धडा शिकविण्याचा बेत चालला होता. मुलींच्या एक एक कल्पना ऐकून त्यांचे छान मनोरंजन होत होते. त्या सर्व गोंधळामध्ये तिचा आवाज येत नव्हता. त्यामुळे त्याला वाटलेच नाही की हे सर्व आपल्या संबंधी असेल म्हणून. मध्येच त्याला तृप्ती कुलकर्णीचा आवाज आला, आणि तिचे ते वाक्य ऐकून तो सरद्च झाला. म्हणजे ही चर्चा माझ्या संबंधी होती तर. आणि ही खरी क्लेरा फर्नांडिस नव्हे. शीलानी विचारलेला प्रश्नही त्याने ऐकला होता. 'खरेच काय गं अनघा ते देशमुख सर आहेत?' हं, तर ही अनघा... आणि त्यानंतर तिचे एक एक वाक्य ऐकून तो संतापत होता. अनघा त्याच्या संबंधी काय वाटेल ते बोलत होती. तो अतिशय चिडला होता, त्या कोणा अनघाच्या एक सणसणीत थोबाडीत द्यावी असे त्याला वाटू लागले. तोच सर्व आवाज एकदम बंद झाले. त्याने ओळखले, आपलं इथलं अस्तित्व या मुलींच्या लक्षात आले आहे. वळून पाहण्याचा मोह त्याने आवरला. मागच्या टेबलावर आता कोणीच काही बोलत नव्हते. एक एक जण उठून त्याच्या समोरून बाहेर जाऊ लागली. जाणाऱ्या मुलींकडे तो पाहत राहिला. भराभर साऱ्या गेल्या. पण ती अनघा मात्र गेलेली नाही. छे. नजर चूक होण्याची शक्यताच नाही. आज तिने घातलेली लाल मॅक्सी नक्कीच लक्षात आली असती आपल्या. त्याने मागे वळून पाहिले. मागच्याच खुर्चीवर ती हातात पुस्तक घेऊन बसली होती. अभिजीतने क्षणभर विचार केला, आणि तो जागेवरून उठला, "एस्क्यूज मी. मिस अनघाSS! तुमच्या अभ्यासात मी थोडासा व्यत्यय आणतोय. सो सॉरी! मला तुमच्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे आहे." असे म्हणत तो सरळ तिच्या जवळच्या खुर्चीत बसला. अनघा खूप गोंधळली. आल्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे तिला काही समजेना. ती खाली मान घालून बसून राहिली. सर्वांबरोबर इथून निघून गेले असते तर किती बरे झाले असते. स्वतः:च्या मूर्खपणावर ती चरफडली. तिच्या हातातील पुस्तक काढून घेत अभिजीत म्हणाला, "मिस अनघा, तुम्हाला पुस्तक उलटे धरून कसे काय वाचता येते? ह्यावरून माझ्या लक्षात आले. तुम्हाला 'सरळ' काहीच करता येत नसावे. सरळ बोलता येत नाही. सरळ विचारही करता येत नाही. चालायचेच! काही असतात तुमच्यासारखे विचित्र स्वभावाचे. बरं, ते राहू द्या. महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे माझी फार स्तुती करीत होता. वा! काय एक एक उपमा दिलीत मला! आतापर्यंत माझ्या बाबतीत एवढा चोखंदळपणा कोणी दाखवला नव्हता. त्या तुमच्या स्तुतीने मी खुश व्हायला पाहिजे नाही?" "सांगा ना?" ठीक आहे. मी सांगून ठेवतो तुम्हाला, यापुढे मला ही असली बोलणी खपणार नाहीत, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला चांगला धडा शिकवलात. बावळट बनवले? भ्रम आहे तो तुमचा. मी एका वाक्यात तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकलो असतो. पण विचार केला जाऊ दे. एवढ्या मुलांमध्ये असा अपमान करायला नको एखाद्या मुलीचा. नंतर हीच मुले तुम्हाला चिडवून बेजार करतील. हं. पण आता वाटते, माझा तो विचार अयोग्य होता. हो! एका गोष्टीत मानले बुवा तुम्हाला! तुमच्यासारख्या 'छचोर' मुलींनाही एवढी समयसूचकता असते याची कल्पना नव्हती मला." त्याचा तो छचोर शब्द अनघाच्या हृदयाला जाऊन टोचला. ती घायाळ स्वरात म्हणाली, "प्लीज... प्लीज... स्टॉप इट. मला ऐकू येत नाही हे." "का हो? मी तर तुम्हाला फक्त एकच उपमा दिली. तीसुद्धा ऐकवेना? कमाल आहे तुमची. मग तर तुम्ही माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे." अभिजीतच्या स्वरांना एक प्रकारची धार होती. "या कॉलेजमध्ये मी नवीन आहे असे समजू नका. याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी असा प्रकार माझ्या जीवनात आला असता तर मी एवढ्या शांतपणे मुळीच सहन केला नसता. "मी नुकतीच माझ्या या जीवनाला सुरूवात केली आहे. या पहिल्याच आठवड्यात जवळजवळ साऱ्या विद्यार्थ्यांना मी आपलेसे केले आहे. माझ्या डोळ्यांसमोर काही स्वप्नं आहेत. माझ्याबद्दल या विद्यार्थ्यांच्यात काही भावना असाव्यात. पण... तुम्ही माझ्या स्वप्नांचा चुराडा करत आहात. मी म्हणतो हे सर्व तुम्ही काय मांडले आहे? मी असा तुमचा कोणता मोठा अपराध केला आहे? योगायोगाने झालेल्या साध्या गोष्टीवर तुम्ही एवढे रान माजवलेत. तेव्हासुद्धा तुम्ही मला शाब्दिक फटकारे मारले, मी गप्प बसलो. पण आता या सर्वांसमोर मला का बदनाम करत आहात? एकीच्या तोंडून दुसऱ्याला, तिसऱ्याला... झालेल्या गोष्टीला आणखीन तिखट-मिठाची फोडणी द्यायच्या मुलीच्या जन्मजात गुणामुळे ही ठिणगी केवढी होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? "तुमच्यासारख्या मजेने कॉलेजला येणाऱ्या मुलीला त्याचे फारसे काही वाटणार नाही म्हणा, पण त्याची झळ मलाच सोसावी लागणार आहे. मला पाय रोवून उभे राहण्यापूर्वी का खाली पाडता आहात तुम्ही? सांगा मिस अनघा... मला उत्तर हवं." अनघा आपला थरथरणारा ओठ दाताखाली धरून बसली होती. तिच्या डोळ्यांत पाणी येऊ पाहत होते. "तुम्ही काही बोलत नाही, ठीक ! तुम्हाला एक जाणीव द्यावी म्हणतो, तुमच्या सौंदर्यावर तुम्ही वाटेल तेवढ्यांना बोटाच्या तालावर नाचविले असेल. पण मी त्यातला नाही. मला रूपापेक्षा गुण आवडतात. गुण ! त्याबाबतीत तुम्ही शून्य आहात, शून्य ! मला... मला केवळ तुमचा रागच आला आहे असे नाही, तर... तर मला तुमच्या रूपाचा, सौंदर्याचा तिरस्कार वाटतो... आयू हेट यू..." अभिजीत झटक्यात उठून लायब्ररीच्या बाहेर पडला. टेबलावर डोके ठेवून अनघाने आतापर्यंत अडविलेल्या डोळ्यांतील अश्रूंना वाट करून दिली.



